हा ब्लॉग शोधा

सोमवार, २६ सप्टेंबर, २०१६

गाळ

(वृत्त: लीलारति)

तो सतत बोलतो फक्त निरर्थक जरी
वाटते मला ते अर्थपूर्ण अंतरी
वर त्याचे म्हणणे जुने तोच खोडतो
लवचिक कोणी तो त्यात मला भासतो

तो गुन्हेगार साथीला घेता कुणी
मी म्हणतो,"निश्चित गूढ व्यूहबांधणी!"
.... पण खोल आत आता काही जाचते
शंकित बुध्दी भावनेसही ग्रासते

मी मनात जपतो आहे प्रतिमा भली
ही मेख मला समजू आहे लागली
आधार स्वतःचा घेत सुप्त नेहमी
मी मलाच देतो प्रतिमेची त्या हमी

पर्यायच काही उरला जेव्हा नसे
मी सहज नि सोपे ... काय करावे .... कसे ... ?
... हा प्रश्न पडे अन् कठीण उत्तर स्फुरे
“करण्याजोगे सोपे ना काही उरे!"

शतकाशतकांची घट्ट सनातन घडी
साकळली जिच्यात मूढ मती भाबडी
कणखर बुद्धीला करून टाके लुळी
मेंदूत भरे वर स्वप्नांची पोकळी!

जो युगायुगांचा गाळ इथे साचला
पाहिजे तसा तो सावकाश काढला
कोणात कधी मी देवदूत पाहणे
हे पुन्हा पुन्हा गाळात रुतत राहणे!


- निलेश पंडित
२६ सप्टेंबर २०१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा