येरझारा थोडका संचार वाटावा कसा
हात जो सुटणार तो आधार वाटावा कसा
उमटतो कंठात दबतो नेहमी अस्पष्टसा
शब्द क्रांतीचा असा अंगार वाटावा कसा
गुंफली कोमेजली सुकली तरी उरली फुले
फक्त ते निर्माल्य आता हार वाटावा कसा
जीर्ण खोपट प्रजननासाठीच धडपड आतली
अर्धपोटी चालता शृंगार वाटावा कसा
मूढतेने घोकलेले शिकतसे पुढची पिढी
तो कधी ह्रदयातला उद् गार वाटावा कसा
राहिले स्तर तेच नावे फक्त काही बदलली
जन हरीचे म्हणविणे उद्धार वाटावा कसा
चारचौघांचे उपोषण राजकारण त्यातही
फक्त देखावा असा एल्गार वाटावा कसा
- निलेश पंडित
२३ जानेवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा