हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २६ जानेवारी, २०१७

सुरई


नाही ...
एक जमलं नाहीच
आणि जमलं त्यातही
नव्हतं एकमेवाद्वितीय
काहीच


पिढ्यान् पिढ्या मुरणारं
दशकानुदशकं पुरणारं
आणि शतकानुशतकं उरणारं
जहाल रसायन
झालं तयार


स्वतःची भीती
त्याखाली रुजलेलं
बालपणातल्या जीवघेण्या
अतिसामान्यत्वाचं न्यून
आपल्या-जवळच्या-आप्तांवरही
अविश्वास
भयगंडातून जन्मलेली पाशवी सूडबुद्धी
त्यात घातलेला
कुठल्याशा परराष्ट्रांच्या
कुटिलतेच्या बागुलबुवाचा मसाला
कष्ट, साधेपणाचा अखंड देखावा
तथाकथित देशभक्तीचा अर्क
प्रत्येक कणाकणाचं क्षणाक्षणाचं
छुपं सूक्ष्म नियंत्रण
.... हे सर्व
रक्तानं माखलेल्या
हातांनी ढवळून
स्वतः
सत्ता आणि ऐषोआरामाच्या छायेत राहून ....

अमीन, स्टालिन, चौसेस्कु
या पहा या
ना होतात तुम्ही एकटे
ना युगांडा, रशिया, रूमानिया

... आणि नाहीच जमलं तुम्हाला
हे नकळत पाजणं जनतेला
जनमताची नक्षी असलेल्या
लोकशाहीच्या लखलखत्या
मात्र आतून अस्वच्छ सुरईतून



- निलेश पंडित
२७ जानेवारी २०१७ 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा