नेमकी तसलीच संधी तीच आशा स्वप्न ते दिसता पुन्हा बहरून येते दैव माझे
थेंबथेंबाच्या हिशेबाने पुन्हा गाळून थोडा घाम थोडे रक्त नेते दैव माझे
रोज पडता कैक स्वप्ने जीव त्यांना पाळतो कुरवाळतो अन् जपत जातो काळजाशी
मात्र ना कंटाळता ह्या सर्व स्वप्नांची नव्या वाहून नेते फक्त प्रेते दैव माझे
जे जसे मिळते तसा जमवून घेतो ज्यात मी जगतो समाधानात अन् रुळतो जरासा
एवढेसे स्थैर्य हे बघताच मी ना पाहिलेल्या संकटाचे दान देते दैव माझे
खेळ मोठा रंगतो हुलकावणीचा टाळण्याचा भाळण्याचा आणि अश्रू ढाळण्याचा
शेकडो पत्ते बदलती मात्र शेवटच्या क्षणाला नेहमी ठरतेच जेते दैव माझे
सावरावे हा कधीही योग नाही हे समजता संपती सगळ्याच आशा 'पंडिता'च्या
ही अवस्था जाणते अन् सुज्ञतेने चार शब्दांचे मळे पिकवून घेते दैव माझे
- निलेश पंडित
४ फेब्रुवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा