शब्दरचनेत । बाहेर शब्दार्थ
आत गर्भितार्थ । लेखकाचा
त्याही खाली वसे । सुप्त मथितार्थ
केवळ जो सार्थ । वाचकाला
स्तरास्तरांचे हे । संवादांचे अंग
सर्व मनरंग । विघटित
हास्य वरवर । काळजात कळ
मनी वळवळ । कीटकांची
कीटकांचा नाश । करण्याची त्यात
धडपड आत । चालतसे
मंत्र जपजाप्य । नाम मौन काही
योग प्रयोगही । रोज नवे
जरी बदलली । रोज खळखळ
निव्वळ उथळ । तेच पाणी
दिसायला दार । बंद वा उघडे
थोडीशी कवाडे । बाहेरून
मात्र दालनात । कित्येक दालने
चिरे नवे जुने । बांधतात
आयुष्याची साल । रोज वरवर
सोलूनही गर । हाता न ये
थोडे मागे जाता । मारताना सूर
खोली पुरेपूर । दिसू लागे
विहार करता । खोलवर तीत
गर नि सालात । भेद नुरे
- निलेश पंडित
५ फेब्रुवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा