हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

वेगळा


फक्त फसवे स्वप्न देणाऱ्यास का दाता म्हणू मी?
भूमि जी पोसू न शकते का तिला माता म्हणू मी?

जो हवा तो शब्द देतो आणि सोयीने बदलतो
कमनशीबी भोळसर की मारतो बाता म्हणू मी?

तत्व कोणाचेतरी हा नेमके सांगून जातो
तत्वचौर्याचाच त्याला का न उद् गाता म्हणू मी?

ना नवे वक्ता कधी हा बोलला ना आज बोले
घोकतो जर तेच त्याला का न व्याख्याता म्हणू मी?

तो सभेशी बोलताना श्वास त्याचा बाण होतो
का न आता फुंकण्याचा फक्त तो भाता म्हणू मी?

स्वप्न पडले स्वप्न विरले ते न बदले जे बिघडले
का न हाही वेगळा नाही कुणी आता म्हणू मी?


- निलेश पंडित
२५ फेब्रुवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा