हा ब्लॉग शोधा

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७

अध्याय


तो ती त्या ही आणि ते
पाच मनं पाच देह
रमतात
वक्ष नितंब योनी आवेग रसरशीत
आणि अशाच बऱ्याच काही
शब्दांच्या जंजाळात
स्वत:स नकळत
गुरफटत जात
शब्दजन्य चलत् चित्रात
काव्यकलेच्या
समाजमान्य मंचांवरच्या मांडणीतील
.... आणि देतात दाद
फक्त उत्कृष्ट अभिव्यक्तीसाठी

मात्र परततात
आपापली
अपूर्ण धगधगती मनं घेऊन

तो
त्याच्या अतृप्तीस न जुमानता
इतरांच्या तृप्तीवर बहरलेल्या संसारात
ती
पोटगीवर चालणाऱ्या
तिच्या एकाकी घरात
ही
तप्त स्मृतींनी
भरलेल्या घरात
स्वत:चं लसलसतं
एकटेपण घेऊन
त्या
गंतव्यहीन असह्य पोकळीत
केवळ मोजक्या काही
वर्षांसाठी उरलेल्या
आणि ते
आजींच्या शेजारी
नेहमीच्या जुन्या पलंगवर
सभ्यतेने दाबून ठेवलेली
न शमणारी वैविध्याची आस
पुन्हा उद्या गोंजारण्यासाठी

रात्र चढत जाते
चालूच राहतो अखंड
न संपणारा
रसनिष्पत्तीचा अध्याय दुसरा


- निलेश पंडित
२६ फेब्रुवारी २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा