हा ब्लॉग शोधा

शनिवार, ११ मार्च, २०१७

शुचिता

(वृत्त: भवानी / भूपति)

अंगास स्पर्शता काही येते नकळत उग्र शिसारी
भडकून झटकता हात दिसे जाताना कुणी भिकारी
मी पुन्हा एकदा भेळेमध्ये रमतो
क्षण सौख्याचा हातात बळे मी धरतो
आतून नेमका त्याच क्षणी आवाज कुणाचा येतो?

कर्तव्य दक्ष कर्मास बद्ध निष्ठूर नि निर्दयही मी
मिळवतो खर्चतो वाढवतो धन करतो संचयही मी
सदसद्विवेक माझ्यापुरता मी जपतो
डोळ्यास बांधतो झापड आणिक खपतो
चेहरामोहरा दीन जगाचा अवचित का आठवतो?

भरघोस प्रकाशाचा साठा करतो मी माझ्यासाठी
करतो वर शुचिता त्याची जपण्याचीही आटाआटी
लखलखाट माझा माझ्यासाठी असता
विश्वात रम्य मी माझ्या सदैव रमता
काळोख उग्र अनपेक्षित का, कोठून, कसा अवतरतो?

अंतर्मन मनात ... त्याखालीही सुप्त असावे काही
मी चतुर विचारी कुटील भोळा वरवर असो कसाही
अंतरी अपरिचित विचित्र शुचिता वसते
समजून जिला मी जपतो ती ही नसते
अज्ञात कोणता अगम्यसा हा मी माझ्यातच वसतो?


- निलेश पंडित
१२ मार्च २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा