विषमतेच्या भेसूर स्वरुपाची
न संपणारी चिकित्सा करणाऱ्या
समतावादी प्रबोधक निराशावाद्यांनी
फक्त पहावा
जगाच्या अनंत पार्थिव जडणघडणीचा
प्रत्येक पापुद्रा
उचकटून
त्यांना दिसत राहील
केवळ मूलभूत समता
सर्वत्र व सखोल
नेहमी
जगाच्या सातांतल्या
सहा भाग मानवी रक्ताघामातून
निर्माण होणाऱ्या
एक भाग अमृताची
निरंतर बेगमी
तिची
सप्तपाताळांना पृथ्वीवरच राबवून
मूठभर असामान्यांना
त्यांच्या सात पिढ्यांसाठी
दिली जाणारी हमी
ती देणारे
कृष्णवस्त्रविभूषित
अदृश्य मात्र सुरक्षित
सशस्त्र सूत्रधार
व साता समुद्रांपलिकडे
ह्या जीवघेण्या विषमतेवर
( ... सर्व जग सुखी स्थिर ठेवल्यास
जो फोन आठ हजार डाॅलर्सना मिळेल
तो आठशे डाॅलर्सना खरेदी करून .... )
विदारक विद्रोही
काव्य रचणारा मी
सर्वत्र समता
फक्त एवढंच
की स्वरूप भेसूरच
- निलेश पंडित
१८ फेब्रुवारी २०१७
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा