हा ब्लॉग शोधा

रविवार, १९ मार्च, २०१७

सांज


सांजवेळी जग जरासे जसजसे संथावले
जीवना माझे तुझे नाते जरा रुंदावले

मी प्रकाशाच्या नशेतच चूर तेव्हा राहिलो
सावल्यांच्या आठवांनी आज मन खंतावले

वेळ नव्हता पाहण्याला काय मागे राहिले
राहिले त्याचेच वादळ शेवटी घोंगावले

जवळ काही दूर काही भव्य देखावे पुढे
काय मी त्यांचे करू डोळेच जर थंडावले?

शब्द मी उधळीत असता वेळही अपुरा पडे
शब्द आणिक मौन दोन्ही शेवटी मंदावले


- निलेश पंडित
२० मार्च २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा