हा ब्लॉग शोधा

शनिवार, १३ मे, २०१७

सुवर्णरेखा


ती सुवर्णरेखा कुठे नाहिशी झाली
का लयास गेल्या नकळत झरत्या ओळी
का विरले सुकले शब्द
मी स्तंभित बधीर स्तब्ध
तेजात छटा का अशी निशेची आली

अवतीभवती भरपूर नव्याने घडते
नाविन्य त्यातले क्षणैक मोहित करते
पण आत तोच तो साचा
त्या पूर्वीच्याच जगाचा
हे कळता सारी नवलाई ओसरते

उमलते मात्र ह्यातून आत आतून
हा सोस नव्याचा ही जाणीव नवीन
भानावर मी मग येतो
अन् वेध जुन्याचा घेतो
गवसते रत्न समजलो ज्यास मी जून

मग अद्भुत पंचम पुन्हा पुन्हा लावावा
श्वासात स्वच्छ भरपूर जीव रमवावा
भरघोस रेशमी रंग
पाण्यावर मुक्त तरंग
अन् जन्मच अवघा सहजतेत फुलवावा

ही स्थिती टिकावी फक्त नेमकी आता
ना खंत उरावी अखेर जाता जाता
ना अभिलाषा बदलाची
ना खंत जुने सरण्याची
अन् चोख समेवर यावे गाता गाता

- निलेश पंडित
१३ मे २०१७

३ टिप्पण्या: