हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १६ जून, २०१७

हट्ट


श्वास माझा संपला तो क्षण मला कळलाच नाही
भ्यायला होता परंतू जीव हळहळलाच नाही

तापत्या सूर्यासवे मी धावण्याचा हट्ट केला
दिवस माझा संपला पण सूर्य मावळलाच नाही

पावले अर्थार्जनासाठीच गेली झिजत माझी
अर्थ मृत्यूएवढा जगण्यात आढळलाच नाही

सर्व इच्छा नेहमी कालांतराने पूर्ण झाल्या
कोणताही मनसुबा जिथला तिथे फळलाच नाही

माणसे कित्येकदा मी जोडली सांभाळलीही
एकटेपण सोसण्याचा योग पण टळलाच नाही

जसजसा झालो विरागी दैव अधिकच क्रूर झाले
पीळ त्याचा सुंभ मी जाळूनही जळलाच नाही

- निलेश पंडित
५ जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा