हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २७ जून, २०१७

शाळा

(वृत्त: वनहरिणी)

ताठ मान अन् ताठ कण्याचे धडे शिकवले ज्यांनी पूर्वी
त्याच सरांची आम्ही परवा डुगडुगणारी मान पाहिली
जीर्ण भिंत शाळेची तेव्हा शेवाळ्याने भरली होती
रस्ता रुंदीकरणामध्ये कुणीतरी ती काल पाडली

आर्किटेक्ट अन् अभियंता हे शाळेचेच जुने विद्यार्थी
यशस्वितेसाठीच आमच्या शाळेची तर अमाप ख्याती
अनेक माजी विद्यार्थ्यांना आता रस्ता रुंद हवासा
शाळे-भिंतीमुळेच त्यांची पुढील प्रगती अडली होती

उंच इमारत उंची वस्त्या परभाषेचे लखलखते जग
नवे ज्ञान विज्ञान नवे संस्कार नवे साधनेही नवी
शहराच्या त्या नव्या नव्या क्षितिजांवर वसती नवीन स्वप्ने
त्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी दिशा नवी अन् गतीही हवी

शाळेनंतर शाळेकडून शाळेच्या मर्यादा शिकलो
आम्हा केले उभे तिने पाडून तिला मग उभे ठाकलो


- निलेश पंडित
२७ जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा