हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २९ जून, २०१७

गुंता


जगणे अवघे । वळून पाहता
गुंता सारा आता । सुटतसे

माणसागणिक । जन्मा आली नाती
दृढ झाल्या मिती । आयुष्याच्या

काळवंडलेले । किरटे चेहरे
त्यांतही बहरे । काव्य माझे

चित्रात माझ्या मी । पिचलेले जीव
पाहता उणीव । रेखाटले

कुणी आस्वादक । कुणी प्रकाशक
कुणी दिग्दर्शक । लक्ष नाती

कुणी होई मित्र । कुणी सहकारी
नात्यांना उभारी । अमर्याद

किर्ती आणि पैसा । जोडीला प्रसिद्धी
ह्यातूनच वृद्धी । नात्यांचीही

रक्ताची जन्माची । आणि रक्ताविना
नाती रोज नाना । जोडली मी

राहिली एकच । नात्यात उणीव
पिचलेले जीव । परकेच

काळवंडलेल्या । चेहऱ्यापासून
अंतर्मनातून । अलिप्त मी

आयुष्याच्या अंती । अखंड सलते
चेहऱ्याशी नाते । ह्रदयाचे

माझ्याशी माझेच । चाचपता नाते
पस्तावत जाते । मन मागे

- निलेश पंडित
२८ जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा