हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३० जून, २०१७

छत्री


अजून एक टवका
दशकानुदशकंच काय
शतकंही
वंशपरंपरागत टिकणाऱ्या तगणाऱ्या
शिसवीच्या
टणक दणकट
लाकडी कपाटाच्या काठाचा
पुन्हा एकदा उडाला
बाप्पांच्या थरथरत्या हातातल्या
छत्रीचं टोक
अनवधानानं
खण्णकन् आपटताच

बापाकडे पहात
त्रस्त यशवंता पुटपुटला
"सारकं आतभाईर करतंय तिच्यायला
कवा मरंल म्हातारं कुनास ठाव की"

गोंद्या बापाचं ऐकून हसला
तुच्छतेनं छद्मी

निर्विकार होतं फक्त कपाट
पहिलाच नव्हता हा
टवका बाप्पा यशवंता गोंद्या
ना होती पहिली
दशकं शतकं
किंवा छत्री


- निलेश पंडित
३० जून २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा