हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

तळे


राखता कोणी तळे दुसराच पाणी चाखतो
भाग वरती राखणार्‍याच्या कमाइत मागतो

वाढली त्याच्याच नकळत माणसाची थोरवी
रक्त त्याचे शोषणाऱ्यालाच तो सांभाळतो

ताठ मानेने रहा हे शिकवले जेथे मला
मी तिथे झुकतो व मग कमरेत कायम वाकतो

कालपावेतो जगासाठी पिकविले पोटभर
तोच जमिनीचा पुरा तुकडा पुढे भेगाळतो

लाभते आता जरा आहे जगाला निश्चिती
गाळणारा घाम नंतर आसवेही ढाळतो

रुजवली जगण्यात त्याने छान स्वप्ने आमच्या
मार्ग आता तो स्मशानांचे अचानक आखतो

निर्मिले आहेस तू ते जगव आता माणसा
माणसाची रोज आता देव करुणा भाकतो

- निलेश पंडित
१२ आॅगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा