हा ब्लॉग शोधा

शनिवार, १२ ऑगस्ट, २०१७

सुस्थिती


तू मान कधी वा नको कधीही मानू
हे असेच असते घडते असेच सारे
बदलते नेहमी जेव्हा घडी जगाची
अंतरात वसते कधी न ओसरणारे

भावना घडवते घट्ट बेगडी पाया
ज्यावरती चढतो तर्काचा डोलारा
काळीज मानते ती मेंदूची प्रतिमा
जो खरा निरर्थक स्वप्नांचा गाभारा

ऐकवते घड्याळ टिकटिक पोकळ फसवी
आभास तारखा महिने अन् वर्षांचा
शतके शतकांमागून बदलती दिसता
काळात भास आढळतो उत्कर्षाचा

आयुर्मानाचा सतत वाढता पल्ला
लखलखाटात नवनवीन दुनिया दिपते
मागील भयंकर अंधाराच्या पोटी
मुठभर लोकांची हिंस्त्र पशूता लपते

जे कळते आता तेच कधी न कळावे
पण कळता नंतर अशक्य ते विस्मरणे
त्या अंधारातच तुझे नि माझे रुजते
.... सुस्थितीतील वाचका .... सदोदित ... जगणे

- निलेश पंडित
१३ आॅगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा