हा ब्लॉग शोधा

शनिवार, १९ ऑगस्ट, २०१७

बाधा


भले मृत्यू तिथे कोणास मग जगतो इथे कोणी
गदारोळात जगताना क्षणाची झोपही लागे
पिशाच्चे जाणिवेची रोज छळती सौख्य लुटताना
पुढे स्वप्नातही येती व्यथा होऊन ती मागे

स्मशानाची जिथे कक्षा दिसे संपून जाताना
तिथे जगणे सुरू होते असे वेडे कुणी म्हणती
गडदशा किर्र काळोखात थोड्याशा उजेडाची
अचानक बेगमी करते चिता अज्ञात धगधगती

कुणाला कोण समजावे असे पडते कधी कोडे
दिसे जी वाट मळलेली तिच्या ठायी खडे सारे
जरा निरखून बघता ती कुठे दिसते छुपे पाणी
नि इवलेसेच दिसते रोपटे त्यावर बहरणारे

भयंकर जीवघेण्या दाट काळोखात तगताना
नकोसे वाटते जगणे कधी अस्वस्थता येते
अशा वेळी मिळे अवचित मनाला साद दोघांची
उभारी ती चिता ते रोपटे आयुष्यभर देते

मला हे ना कधी कळले चिता की रोपटे व्हावे
उभा मी जन्म की रस्त्यातला व्हावे खडा साधा
परंतू हे समजले एकटे पण वेगळे असणे
जणू असते विषाला अमृताची कायमी बाधा

- निलेश पंडित
१९ आॅगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा