हा ब्लॉग शोधा

सोमवार, २१ ऑगस्ट, २०१७

प्रवास


तुझ्या मनात नेहमीच एक खूळ नांदते
स्वतंत्र तू असे तुलाच अंतरात भासते
जगातला भयाण क्रूर अन् छुपा विनोद हा
"तुझ्या मतानुसार पूर्ण लोकतंत्र चालते!"

रुजे तुझ्या मनात ते तसेच आखतात जे
तुलाच ते विचारतात "सांग काय पाहिजे"
पुढे जसे जसे तुला हवे तसेच सांगुनी
स्वत:स थोर लेखिती दुजा कुणा खुळे खुजे

कुणास कोण नेमतो कुणास कोण खेळवे
खरे कसे नि काय तूच ओळखायला हवे
अशाच शोधण्यात पूर्ण जन्म खर्चिता कुणी
पिढी पुढील पाहते तमात काजवे नवे

सहस्त्र काजवे असे जणू मशाल वाटती
अशा असंख्य पेटता दिशा नवीन लाभती
कधी खरी ठरून ती कधी जरी चुके दिशा
असंख्य पाय चालती नव्या युगी नवी गती

जरी कठीण रुक्ष अन् प्रदीर्घही प्रवास तो
अशक्यप्राय शृंखला अखेर तोच तोडतो
हुकूम सैन्य लोक साम्य राष्ट्र धर्म ... पाडता
जगास माणसास तोच राखतो उभारतो


- निलेश पंडित
२१ आॅगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा