हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

आसरा


आसरा देऊन ज्याला रोज मी ओवाळतो
वाढतो बेफाम तो नंतर मलाही जाळतो

वाटतो वाचाळ जो ऐकून त्याचे बोलणे
तोच मोक्याच्या क्षणाला मौन पक्के पाळतो

दंगली भरपूर केल्या ना कुठेही अडकला
मात्र एकांतात आता तो स्वतःला टाळतो

मारता इकडे नि तिकडे माणसे हकनाकही
राष्ट्रवादाचा कहर दोन्हीकडे बोकाळतो

जाळले कोणी कुणी पुरले जनांना आपल्या
पाहुनी संहार हा श्रीकृष्णही ओशाळतो

प्रश्न इतका चिघळता वनवास छोटा वाटतो
विषय निघता मंदिराचा राम अश्रू ढाळतो

- निलेश पंडित
२९ आॅगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा