हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

पाचोळा

(वृत्त: दासी)

स्वप्नांच्या माळेला आशेचा हिंदोळा
दगडाच्या माथ्यावर लावी माणूस टिळा
... लखलखाट गोंगाटाची सभोवती माया
जाणिवेत जगणारा कोपऱ्यात पाचोळा

काळ उग्र काळ स्वस्थ मनकवडा मनद्रोही
कृपावंत क्षमाशील काळ क्रूर निर्दयही
... संतत बदलतो रंग कधी कधी शाश्वतसा
बाह्यांगी चंचल पण अंतरात निर्मोही

अर्धीमुर्धीच होतसे स्वप्नांची पूर्ती
हरखणे नि बावरणे ह्यातच शतके सरती
... वास्तव नसते वास्तव या जगात दीर्घकाळ
चिरनिद्रा ह्याच जाणिवेत लाभते अंती

पण सुकलेला पाचोळा बीजासह उरतो
यथाकाल त्यातूनच एक वृक्ष अवतरतो
... भूगर्भातही ठसा अश्मावर सोडतोच
नवयुगास ठशातून नवा मार्गही स्फुरतो


- निलेश पंडित
३१ आॅगस्ट २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा