हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २२ सप्टेंबर, २०१७

भरजरी


अटळ मृत्यू प्रश्न आहे ही दरी का ती दरी
पाहता एकीकडे वाटे जरी दुसरी बरी

आमच्या जमिनीतुनी आम्हास जे हुसकावती
माय म्हणण्याची तिला करतात ते सक्ती तरी

मग्रुरीने मागताना भीक अथवा खंडणी
सांगती ते नांदली लक्ष्मी कधी त्यांच्या घरी

सर्वशक्तीमान असणे ही न आता कल्पना
मात्र देवा तू न तो ओळख स्वत:ची पायरी

उत्सवांच्या सज्जतेसाठी इथे चाकूसुरे
भास होतो देवही करती यमाची चाकरी

समजले सौंदर्य आता काय असते नेमके
देह किडका पण असावे वस्त्र किमती भरजरी


- निलेश पंडित
२३ सप्टेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा