हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ८ सप्टेंबर, २०१७

रुजवात


म्हणतात
ह्या अव्याहत चालणाऱ्या
जगड्व्याळ चक्रात
दडलेली असते
एक नवी सुरुवात
प्रत्येक अंतात

म्हणतात
एकलव्याच्या अंगठ्याचा
जाब मागणारी
जमिनीवरचा दावा न सोडणारे
भूमिपुत्र भूमीहून महत्त्वाचे
मानणारी
कुणीतरी
मारली गेली परवा
आधीही तसाच
गेला होता कुणी

म्हणतात
राजकीय कौटुंबिक
की व्यक्तिगत कलहातून
म्हणतात
न्याय होईलही
इथल्याच
न्यायाचार्यांकडून

म्हणतात
नेमकं काय कसं
कळलं नाही
कधी कळणारही नाही
ज्यांना कळेल
ते सांगू शकणार नाहीत
कदाचित

म्हणतात
असतेच संदिग्धता अटळ
अशा काळात
नक्कीच होत असावी रुजवात
नव्या युगप्रवर्तक धर्माची

(अहिंसा परमो धर्म:
धर्म हिंसा तथैव च:)


- निलेश पंडित
८ सप्टेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा