हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३० सप्टेंबर, २०१७

श्रीमंती


माणसास दिसती जगात टिंबे काही
जोडून कल्पितो तो काही मग रेषा
उच्चारा-आवाजांचे करतो शब्द
अन् फुलवे शब्दांमधून मोहक भाषा

कातळ दिसता घडवितो छानशी मूर्ती
तिज बहाल करतो तऱ्हेतऱ्हेचे रंग
जडवितो जीव मूर्तीस मढवितो इतका
अद्वितीय ती पण कर्ता होय भणंग

नियतीची अतर्क्य गूढ नजाकत फसवी
ती देते सुरुवातीला केवळ काया
कालवून थोडी सत्ये थोड्या आशा
माणूस निर्मितो आभासांची माया

आभास कोणता सत्य कोणते ह्याची
करतात चिकित्सा पांडित्याने काही
अंधार प्रकाशाच्या खेळास न पुरती
अज्ञात ज्ञात वा काळ वा दिशा दाही

रेखीव आकृत्या मात्र रंग-रेषांच्या
अन् शब्दसुरांची अनंत अविरत गोडी
निर्मितात दुर्मिळ एक सुप्त श्रीमंती
जगण्याची सौंदर्याची मोहक जोडी

- निलेश पंडित
३० सप्टेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा