हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १७ ऑक्टोबर, २०१७

प्रवास


पैलूपैलूमागे । उणिवांचा साठा
उगाच का ताठा । जगण्यात

पाहताना एक । समजते दुजे
अंतरात खुजे । प्रतिबिंब

प्रतिबिंबास त्या । समजता सत्य
वाटे लाभे नित्य । परिपूर्ती

परिपूर्ती खरी । अनुभवा येते
मात्र ती टिकते । अल्पकाळ

जशी परिपूर्ती । तसाच आघात
चिरंतन त्यात । नसे काही

दिसताच टिंबे । रेषा भासतात
आत वसतात । पोकळ्याही

अर्थामागे व्यर्थ । दडतेच काही
समाधानालाही । ग्रासे व्यथा

शाश्वत वा स्थिर । असंभव जेव्हा
दृष्टी का न तेव्हा । बदलावी

बदल नि वेग । हाच मंत्र व्हावा
रोजच पहावा । नवा सूर्य

सक्तीची विरक्ती । कधी न मुरावी
अंगी बाणवावी । अनुरक्ती

कशास ही चिंता । सत्य वा आभास
सरता प्रवास । सौंदर्यात


- निलेश पंडित
१४ आॅक्टोबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा