हा ब्लॉग शोधा

बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

संकट


नेमकी ती मांडते जी बोचते घुसमट तिला
म्हणविणारे आपले मग समजती संकट तिला

हे तिने वाचू नये तर ते तिने नेसू नये
बाळगावे लागते कसलेतरी झेंगट तिला

मंत्र पडतो रोज कानी यत्र नार्यस्तू तिच्या
सोसता जगणे खरे तो वाटतो बोथट तिला

ती विनोदाचा विषय अन् लालसेचाही छुप्या
लालसा कळता तिची पण मानती हलकट तिला

चूल धगधगते जसा तापे निखारा आतला
थंड होते ती जसा तो लागतो कोमट तिला

राकटाचे फक्त मोठे ह्यास स्नायू लाभता
उजळ माथा ह्यास लाभे लाभतो मळवट तिला

संकटांनी ग्रासलेला जन्म अवघा काढते
गोड असतेही खरे ते लागते गुळमट तिला

- निलेश पंडित
१८ आॅक्टोबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा