हा ब्लॉग शोधा

शनिवार, २१ ऑक्टोबर, २०१७

तळी


कशाला अशी लोकशाही मिळाली जिने श्वापदे सोडली मोकळी
जगे रक्त प्राशून जी मायभूमी तिला मी म्हणावे कशी आगळी

दिशा ठरवती आंधळे अन् अडाणी कुठे जायचे ते कुणा ना कळे
अशी झापडे त्यात देती प्रजेला प्रजा बांधुनी होतसे आंधळी

जिथे फूल कोमेजते आणि मरते जिथे फक्त काटा सुके पण टिके
तिथे मुक्त फोफावती सर्व निवडुंग अन् मुक्त फोफावती बाभळी

पिके होत होती जिथे बारमाही तिथे फक्त दुष्काळ आता दिसे
म्हणे संस्कृती सांगते मानते येथ होता खरा मूळ राजा बळी

तळी राखणार्‍या जिवांनाच आम्ही बहिष्कृत तळ्यांपासुनी ठेवले
नवल काय देशात आता दिसाव्या नद्या शुष्क अन् आटलेली तळी

असे बोलबाला पुन्हा काळ आता इथे रामराज्यातला येतसे
कुणी एक इच्छा धरी मूर्खतेने पिढी मग नवी होतसे पांगळी

- निलेश पंडित
२२ आॅक्टोबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा