हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, १ डिसेंबर, २०१७

समाधी


वाटते जे जे मला ते ते तुलाही वाटते का?
चूक म्हणतो ती खरी संधीच न्यारी वाटते का?

मोह पश्चात्ताप विसरू चल जरा संवाद साधू
जी भले व्याधीच ती क्षणभर समाधी वाटते का?

का समाजाची नजर होते अचानक जीवघेणी?
फक्त सुरई बदलता अमृत विषारी वाटते का?

का असे सोशीत जावे एकटेपण एकट्याने?
पाळतो मी मौन ते माझी खुशाली वाटते का?

नेहमी बोलेन मी ह्याची तुला असतेच खात्री
पाहणे तू वाट हुकुमाची उतारी वाटते का?

रक्त होते आसवे अन् आसवे होतात शाई
'पंडिता'ची गझलही आता विराणी वाटते का?



- निलेश पंडित
२ डिसेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा