हा ब्लॉग शोधा

बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

किटक

ह्यासाठी नव्हे
की ज्या क्षणी उघडावेत डोळे
त्या क्षणापासून मी सतत घेतो
प्राणवायूबरोबरच
भरपूर मुक्त सूर्यप्रकाश
सर्वांगावर,
येणारा स्वच्छ वारा 
भरून छातीत, 
भिजवतो माझ्या घराचं
कौल न् कौल, 
फुलवतो रोप न् रोप
माझ्या परसातलं

आणि बघतो, भोगतो
समाधानानं 
माझं सतत वाढणारं सौष्ठव
अन् फुलणारं, अस्मानाला 
गवसणी घालण्यासाठी
झेपावत राहणारं टुमदार घर

पण ह्यासाठी की
माझ्या आणि माझ्या वाढत्या घराच्या,
झाडाझुडुपांच्या
माझ्या आणि घराच्या "मागे" पडणाऱ्या
सावल्यांमधे असंख्य जीव
(... ज्यांना मी नेहमीच 
रान, किटक, तृण म्हणतो ...)
जन्मले जन्मतात ....
पण प्रकाशपाण्या-हवेविना
थिजतात कुजतात विझतात

आणि तरीही थांबत नाही
माझा वाढीचा हव्यास

जन्म घेते ह्रदयात
एक तीक्ष्ण जाणीव
अपराधी मी

- निलेश पंडित
१३ डिसेंबर २०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा