हा ब्लॉग शोधा

सोमवार, १५ जानेवारी, २०१८

घर


जुनाट कौलारू छप्पर होतं पोपडे पडलेल्या भिंती
अंधारलेल्या खोल्या माजघर आठांची आत वस्ती
... कण्हत पडलेली म्हातारी अन् कातावलेला बाबा
रापलेली आई भावा-बहिणींची वर्दळ अवतीभवती

छोटा नवाकोरा फ्लॅट चौकोनी कुटुंब आत
उच्च मध्यमवर्गीय वस्तीतलं जगणं झंझावात
... दररोज पायरी चढत जायचं बघत आभाळाकडे
डोळे दिपून अंधारी येणं रोज लखलखाटात

पाच सात खोल्या दोनचार गाड्या सोयी त्यांत भरपूर
जोगियापासून मारव्यापर्यंत कृत्रिम करूण सूर
.... बघण्या वाचण्यासारखं खूप पडलेलं कपाटात
दोन पिकली डोकी घरात दोन कुठेशी दूर

काळ बदलतो सरतो आठवणी होत जातात धूसर
माणूस जातं घरातून ... माणसातून जात नाही घर


- निलेश पंडित
१६ जानेवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा