हा ब्लॉग शोधा

रविवार, २८ जानेवारी, २०१८

निर्दोष


(वृत्त: हरीभगिनी)

केवळ अगतिक पांथिक मी मी ना दोषी ना अपराधी
अंधुकसे दिसता काही अंधार समजतो मी आधी
... त्वचारोग आगळाच माझा मेंदूला ग्रासत जातो
वाचवणे कातडी नेहमी हीच मुळी माझी व्याधी

नेहमीच कायदा पाळणे ह्या तत्वाचा कैफ मला
भले अनीती अन्यायासाठीच जरी तो अवतरला
... विवेकास आसपास दिसता खास घालतो लगाम मी
कर्तव्यासाठीच मानतो माझा धोपटमार्ग भला

आत डाचता काहीही असहाय्य मानतो स्वतास मी
चोख वाचतो पाढा आहे काय कुठे अन् कसे कमी
... उदास, दु:खी, खिन्न राहतो ... श्रेय बरे मिळते त्याचे
पण धरण्याची बिकट वाट दाबतो शिकस्तीने ऊर्मी

... मात्र कटाक्षाने जपतो मखरात महात्मा कुणी भला
असे महात्मे म्हणून चतुराईने वापरतात मला


- निलेश पंडित
२९ जानेवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा