हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ९ फेब्रुवारी, २०१८

अस्त

वयाची नोंदही आता नको माझ्या हिशेबाला
असा का वेग वाढावा झपाट्याने उताराला

इथे कोणी न पहिला आणि शेवटचा कुणी नाही
तरी भुलतात कोणाच्या कसे पहिलाच असण्याला

कशाला भान राखावे कुणीही मुक्त असण्याचे
कुणाचे फाटता छप्पर कुणी सजवे तुरुंगाला

म्हणे कमजोर साऱ्या शोषितांचे भान राखावे
कसा अंदाज यावा खोल गाळाचा तवंगाला

इथे ना त्रस्त वा अस्वस्थही कोणीच रहिवासी
कशी ज्ञानाविना अस्वस्थता यावी अडाण्याला

कधीही ये इथे मृत्यो तुझे स्वागत करू आम्ही
तुला पाहून समजू चालला अंधार अस्ताला


- निलेश पंडित
१० फेब्रुवारी २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा