हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, २३ मार्च, २०१८

चाळा

(वृत्त: दासी)

रात्रीच्या प्रहरीही सूर्यासम लक्ष्य हवे
तृष्णेच्या काठावर तृप्तीचे रंग नवे
... पायवाट बिकट पुढे चढउतार त्यात जरी
सुखवितात दृष्टीला पक्षांचे रम्य थवे

क्षणोक्षणी भूतकाळ वर्तमान ग्रासतसे
भयकंपित मन इच्छेचे त्यातच घेइ वसे
... अशी नित्य चढाओढ अंतर्मन अनुभवता
जगण्याला नवी दिशा बघण्याचे गूढ पिसे

उष्ण रक्त कृष्ण विश्व अंताशी श्वेतपर्व
मर्यादित आवाका अमर्याद मात्र गर्व
... धूसरशी स्वप्ने अन् घुसमट जागेपणात
जगता वर्षे कितीक लाभे निमिषात सर्व

रुपकांचा उपमांचा दोनच घटका चाळा
एकसुरी जगण्याला थोडासा विरंगुळा


- निलेश पंडित
२३ मार्च २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा