हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २४ मे, २०१८

रत्न

त्रिशंकूसारखी असते अवस्था नेहमी त्याची
जवळ प्लेबाॅय तर असते तशी गीता नि गाथाही

क्षमाशांती व प्रेमाची हमी देतात दुनियेला
तरी बाहेर बाॅडीगार्ड अन् पिस्तुल उशालाही

असा पहिला कुणी देशास आहे लाभलेला तो
जरी तो श्वान धनिकांचे करे चिंता समाजाची

कुणी जाणून वा नकळत कधी बोलू नये खोटे
जरा अपवाद त्याचा फक्त त्याची मात्र चतुराई

नशा नामी उतारा वेदनेवर आजच्या आहे
तसे जगतात सारे फक्त आशेवर उद्यासाठी

मशालीने मशाली लाख पेटवणे पुरे झाले
इथे जनतेस आहे घोर अॅलर्जी उजेडाची

म्हणे आवाज ऐकावा मनाच्या आतला आता
इलेक्शन मॅनिफेस्टो फक्त जुमला योजना नाही

मनापासून आपण थंड असणे ही खरी भक्ती
स्वतःच्या लागलेला जाळ असताना बुडाखाली

कुणाला अल्पमत असणे नसावी गोष्ट खिल्लीची
कधी खाणीतल्या चिखलात येते रत्न हाताशी


- निलेश पंडित
२५ मे २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा