हा ब्लॉग शोधा

बुधवार, ३० मे, २०१८

अनुरक्ती

गुंतलेले सारे
सोडवित धागे
पाऊल पाऊल
जावे आता मागे

जीभ आठवेल
चाखलेली चव
करतील बद्ध
काही अनुभव

केवळ मौजेने
पहावा तो चाळा
प्राप्य अप्राप्याचा
मांडू नये ताळा

स्वप्ने नवी जुनी
येतील जातील
दुरून ती ये जा
डोळे पाहतील

वाटेल अदृश्य
दृश्य होते आहे
असणेपणही
नसण्यात वाहे

देह मन होता
शिथिल नि मुक्त
भासेल स्वतःस
फक्त निरासक्त

तेव्हा दे जरूर
नेहमीची हाक
सुटूनही गुंता
पुन्हा जाळे टाक

मोह नसण्याचा
मोह होतो आज
करीन मोहाचा
जरतारी साज

लिप्त होता यावे
अलिप्ततेसही
आहोत तसेच
जगूया तेव्हाही

अनुरक्तीसाठी
विरक्तीचा छंद
उरेल केवळ
आनंद आनंद


- निलेश पंडित
३१ मे २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा