हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ८ जून, २०१८

ध्वनी

रोज मी माझ्याविना जगण्यात आता मावतो
मात्र जर फोफावलो तर तोडतो भिरकावतो

नम्रतेने जिंकतो सर्वत्र सर्वांची मने
नम्र माझ्याहून पण दिसता कुणी गुरकावतो

प्रश्न पडतो परतण्याला तळमळेना जीव का
माय नसते रे अशी सागर मला समजावतो

वेग आयुष्यात केला सांजवेळी मी कमी
मात्र हे ठाऊक नव्हते काळही संथावतो

राबतो तो सांगण्यासाठी कसा तो राबतो
आणि मोक्याच्या क्षणाला मात्र तो थंडावतो

दडपतो आवाज सारे तो जिथे जातो तिथे
दडपण्याचा पण ध्वनी वाऱ्यात मग घोंगावतो

-  निलेश पंडित
८ जून २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा