हा ब्लॉग शोधा

मंगळवार, १० जुलै, २०१८

शोध

भ्रमर शोधतो  |  जसा मकरंद
तसा मी आनंद  |  शोधू पाहे

प्रखर प्रकाशी  |  दृश्‍यही दाहक
तसाच बाधक  |  क्षण क्षण

क्षण जरी शुद्ध  |  लिप्त मी होताच
अकस्मात तोच  |  भ्रष्ट होई

ओतप्रोत दिसे  |  आनंद तयात
भरून वहात  |  वरवर

गुंतता मी मात्र  |  हाती पायी गुंता
भय क्रोध चिंता  |  वेध घेती

करतो श्रवण  |  अलिप्ततेची मी
महती नेहमी  |  जागोजागी

मात्र ती नेमकी  |  व्हावी कशी प्राप्त
ह्याचे ज्ञान सुप्त  |  प्रत्येकाचे

ना मी भ्रमर वा  |  जिणे मकरंद
शोधता आनंद  |  मिळेच ना

लिप्तता टाळावी  |  परिणामापाशी
तशीच उद्देशी  |  टाळावीच

उपमा प्रतिमा  |  मर्यादित क्षेत्र
त्यातही विचित्र  |  अपवाद

थांबविता व्यर्थ  |  मुळात हा शोध
अवचित बोध  |  प्राप्त होई

- निलेश पंडित
११ जुलै २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा