हा ब्लॉग शोधा

शनिवार, १४ जुलै, २०१८

अपेक्षा

किती ओझे अपेक्षांचे तुझ्यावर रोज आयुष्या
पुरी होताच एखादी हजारो जन्मती इच्छा

भुकेसाठी कुणी अगतिक दिसे हे नेहमी घडते
असावा तृप्त त्याचीही गळे का लाळ आताशा?

अपत्ये घालतो माणूस जन्माला सुखासाठी
तरी उपकार पोरांवर असे का वाटते त्याला?

इथे हेरून तुमचे न्यून तो स्वप्ने बडी विकतो
पुढे होईल विक्रीतून तो मोठा कुणी त्राता

विवेकाचा व तर्काचा मुलामा नेहमी असतो
परंतू राग दर्शवतो तुझी भोळी छुपी आशा

कुणी काही कधी लिहिताच का ते सत्य मानावे?
सुगावा लागतो जे टाळले त्यातच रहस्याचा

अपेक्षा मीच माझ्या संपवाव्या हीच शेवटची
जरी ती मान्य मेंदूला तरी ना शक्य ह्रदयाला


- निलेश पंडित
१५ जुलै २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा