हा ब्लॉग शोधा

शनिवार, २१ जुलै, २०१८

शिंपला

ऐकले आहे कितीदा थांबला तो संपला
थांबण्यातच का असा मग जीव आहे गुंतला

होत गेले नेहमी वर्षानुवर्षे तेच ते
नवनवी नावे व स्वातंत्र्यात वेडा गुंगला

शेत हे आहे तुझे जप राब कर बलिदानही
बैल घाण्याला असे सांगून त्यांनी जुंपला

लाज थोडी वाटली तर मार्ग सापडतो पुढे
पेरता अभिमान त्यांनी मार्ग तोही खुंटला

धूर सोन्याचा इथे निघतोच आहे नेहमी
त्यामुळे आहे जरी हा देश अवघा खंगला

कालपरवाचीच आम्ही लाचलुचपत समजलो
दक्षिणा-पूजा पुराणा खेळ आहे रंगला

रोवले वाळूत आम्ही पाय लाटा सोसल्या
हरवला मोती पडे हाती रिकामा शिंपला


- निलेश पंडित
२२ जुलै २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा