हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३ ऑगस्ट, २०१८

राखीव

लाडाकोडात वाढलेला
पोटचा गोळा
अथक् परिश्रमांनंतर
निस्तेज डोळ्यांमधे
अपार निराशा साठवून
चिंताग्रस्त
कुठल्याशा न ऐकलेल्या
सुमार संस्थांच्या
फुटकळ जाहिराती
कुतूहलानं लॅपटाॅपवर
बघत असताना
त्याची ती तथाकथित अगतिकता
समोरच्या ग्लासातला
कडसर सुखद घोट घेत
सुन्न होऊन पाहणारा
हताश मी
त्रस्त होऊन टाकतो सुस्कारा
आणि ओरडतो कळवळून
"ठेवा की आरक्षण ...
पण फक्त आर्थिक निकषांवर!"

... आणि नंतरच्या शांततेत
खिडकीतून बाहेर जाते नजर
तेव्हा विटकं ठिगळलेलं
लुगडं नेसलेल्या भंगिणीच्या
खराट्याचा आवाज
आणि तिच्या शेंबड्या किरट्या
अर्धनग्न अर्धपोटी पोराचं रडणं
मला खुणावून ओरडून अजीजीनं सांगतात:

"खरंच करा ...
वाहू द्या लखलखीत चमचमतं धन
सधनांकडून निर्धनांकडे ...
जिथे पाचपन्नास टक्के नव्हे ...
आमच्यातलेच सगळे
... सगळे आमच्यातलेच!"

तेव्हा
लक्ष पुन्हा वळतं ग्लासाकडे कारण
सोयिस्कर विचार करण्याचा हक्क
ठेवला आहे पुरता मी
माझ्याकडे माझ्यासाठी
राखीव


- निलेश पंडित
३ आॅगस्ट २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा