हा ब्लॉग शोधा

शनिवार, ४ ऑगस्ट, २०१८

लाव्हा

शब्द संपले तरी आतवर भासत असते काही
जाणवते ह्या असण्याला संज्ञाच नेमकी नाही
भल्याबुऱ्याच्या जाणिवेस छेदून आत बागडते
जगास रुचते तेच त्यागते द्रोह छुपा जागवते

प्रकाश वरती मात्र खालती पाया अंधाराचा
तरंग मोहक वरती खाली डोह खोल गाळाचा
स्मितहास्याच्या कारंज्यामागे नैसर्गिक वृत्ती
धुवट मनाच्या आवरणाखालीही स्वप्ने पडती

जाणवते समजते मला मन ते तर वरवर साचे
अंतर्मन आतून नेहमी ज्ञात मनाला डाचे
कापडात लपविता नग्नता हाडांना टोचे ती
आकाशी घेताच भरारी मोहविते मज माती

पृथ्वीच्या केंद्रापाशी सळसळता लाव्हा वसतो
मानवात नांदतो पशू तो कधी न विरतो मरतो

- निलेश पंडित
४ आॅगस्ट २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा