हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २१ ऑगस्ट, २०१८

गंज


क्षीण झाली सर्व गात्रे आणि संध्याकाळ झाली
मात्र क्षितिजावर पुन्हा दिसते उषेची सुखद लाली

मानले मी फक्त चतुराईस जीवनमूल्य माझे
दूर झाली माणसे अन् एकटा पडलो महाली

आत होते मात्र आपण ढाळले नाहीत अश्रू
एकमेकांना अशी सांगायची असते खुशाली

वेशभूषा घोषणा अन् खूपसा अभिमान जपला
मात्र पुरत्या गंजल्या साऱ्याच तलवारी व ढाली

संस्कृतीने माणसांची नेमली आहेत कामे
माणसांनी खास वर जोपासली आहे दलाली

फक्त जळल्या अन् वितळल्या सर्व इथल्या मेणबत्त्या
ज्या कधीकाळी समजलो पेटत्या आम्ही मशाली


- निलेश पंडित
२१ आॅगस्ट २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा