हा ब्लॉग शोधा

बुधवार, ८ ऑगस्ट, २०१८

गर्भितार्थ


गगनव्यथेच्या ह्रदयशुळाने मोहित होती राधा
समईवर थरथरली भगवी शृंगाराची बाधा
आकाशी भळभळली चंचल दूरत्वाची गाणी
पदरी पडली अनुभूतीची चंदनवर्खी नाणी

श्लोकांचा अभिशाप लाभता मौन उणे गहिवरले
अमृतकुंभाच्या स्पर्शाने शैशव अखंड झरले
शुष्क पाहता निर्झर अवघी माणुसकी गदगदली
"अलख निरंजन" स्निग्ध चितेची निसर्गवाणी वदली

हिरे माणके यक्षगुणी सोन्याला पाझर फुटला
एक पांगळा राखे मधून अवचित मग सरपटला
दवबिंदूंचे मुक्त मनोरे अवकाशाला भिडले
मनोमनींचे मोती नकळत माजघरी सापडले

विचित्र जुळणी शब्दांची करण्याची सर्कस नुसती
नाव कवीचे बघून जन गर्भितार्थ शोधत बसती!


- निलेश पंडित
९ आॅगस्ट २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा