हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

आशा


शांतता अन् शिस्त येथे चोख असते आजही
रोज किंकाळी इथे फुटताच दबते आजही

नवनव्या बदलांमधे विश्वास राष्ट्राचा इथे
नवनवी स्वप्ने बिचारे राष्ट्र बघते आजही

निरनिराळया देवता दुर्गा व लक्ष्मीसारख्या
आणि कोणी द्रौपदी द्यूतात हरते आजही

सुस्थितीतच वाढलो मी आणि आधीच्या पिढ्या
मात्र आरक्षण मला डोळ्यांत सलते आजही

कालपावेतो जशी फसली तशी फसते पुन्हा
चेहरा दिसता नवा जनता निवडते आजही

भेसळीचे लाभती कडुगोड अनुभव नेहमी
रोज नैराश्यातही आशा गवसते आजही

- निलेश पंडित
६ सप्टेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा