हा ब्लॉग शोधा

शनिवार, १ डिसेंबर, २०१८

प्रेरणा


वाटते मी प्रेरणा शब्दांत असते मांडलेली
मोकळी शब्दांमधे उरतेच जागा बांधलेली

फक्त वरवर वाटते जपले जुने मी सर्व फोटो
मोह जखमा भूल अन् असते नशा सांभाळलेली

माळते कित्येक ती नाजुक फुले गजऱ्यात सुंदर
मात्र मखलाशी अशी .. आधी सुईने टोचलेली

एक क्षण आलीस तू गेलीसही दुसर्‍या क्षणाला
कैक वर्षे ठेवली आहेस मागे भारलेली

तू दिली जी भेट ती आयुष्यभर जपली पुढे मी
वाट माझी एकट्याने फक्त मी चोखाळलेली


- निलेश पंडित
२ डिसेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा