हा ब्लॉग शोधा

शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

वसे


त्रस्त कपाळावर आठीशी गोठत जाई त्वचा
कंठमण्यापाशी थरथरती वृथा श्लोक अन् ऋचा
... इतकी वर्षे जोपासत जे गेला होता उरी
अर्थहीनतेची नियतीने त्यात खुपसली सुरी

आप्त ... आपले ... जे म्हटले ते दूरदूर पांगले
भिस्त ठेवली ज्यावर ते मन ... शरीरही ... खंगले
... काळ ज्ञान जग झेपावत गेले वेगाने पुढे
जपले जे थोडके नेमके पडे आज तोकडे

रोज स्वतःला कसाबसा तो रुजवू पाहे पुन्हा
सूर्यास्तापाशी अंधाराचा क्षण वाटे गुन्हा
... जितके धडपडणे तडफडणे तितकी ग्रासे व्यथा
त्यास कळेना सुखान्तात संपेल कशी ही कथा

नव्या पिढीचे सुरम्य एका क्षणी जाणले वसे
कळले मग नसणेपण नसण्याआधी फुलते कसे


- निलेश पंडित
१६ डिसेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा