हा ब्लॉग शोधा

सोमवार, २४ डिसेंबर, २०१८

त्रयस्थ

(वृत्त: अनलज्वाला)

प्रकाशात जे नवीन त्याचा वाटे मोह
मोहाभवती भयकारक धोक्यांचे डोह
... दडता काळोखात मिळे निद्रा एकाकी
कर्तृत्वाशी भयकंपित मन करिते द्रोह

जिथे पहावे तिथे दिसे तटबंदी सीमा
अतीव अनुचित स्पर्धा देते तणाव, जखमा
... उजेडात राहते प्रतीक्षा काळोखाची
सूर्यप्रकाशी दाह तरी ऊर्जेचा महिमा

मात्र न केवळ पोटच अवघा देहच सांगे
क्षणोक्षणी विणणे न टळे जगण्याचे धागे
... कधी कधी गुंता तर कशिदा सुंदर केव्हा
वर्तुळाकृती मार्गी जग मी आगेमागे

त्रयस्थतेने बघताना मी मला गवसतो
आक्रसतो मग अवतीभवती पसरू बघतो


- निलेश पंडित
२५ डिसेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा