हा ब्लॉग शोधा

रविवार, ९ डिसेंबर, २०१८

समतोल


समजले प्रत्येक क्षण का होत आहे बोलका
काळ उरला ह्यापुढे हातात आहे थोडका

वाटला त्याला असावा चांगला वनवासही
मंदिराचा खेळ बघता राम वाटे पोरका

देशभक्तांची रुपे दिसतात आता नवनवी
वीर मरतो एकटा चर्चेत रमतो घोळका

नेमताना आपला वारस गुणी असतो हवा
मात्र आधी पाहती तो लाडका की दोडका

सांगतो इतिहास त्यांनी गाव लुटले आमचे
कापणे पुढची पिढी त्यांची ठरे समतोल का?

गायले 'पंडित' जिथे गाती तिथे उस्तादही
वेगळे दोघे तरी गाणे नसे अनमोल का?


- निलेश पंडित
१० डिसेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा