हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

नगण्य


ख्रिस्मसच्या शांत सकाळी
दारावर टकटक झाली
अचंबित मी ...
दार उघडताच दिसला
लालगोरा रापलेला म्हातारा

अजीजी लपवत
उसना आत्मविश्वास
स्वत:च्या चेहऱ्यावर
बळेच पसरवत
वाॅकर कसाबसा एका हातानं
धनुर्वातानं वाकडी व्हावीत
तशा बोटांनी सांभाळत
दुसऱ्या हातातली अवजड फाईल उघडत
थरथरत्या मानेनं आणि शब्दांनी म्हणाला,
"माॅर्निंग ... आयॅम् केविन ...
मेक दिज् ...
युनीक ... ओन्ली यू विल हॅव ओरिजिनल
... आय ड्राॅ मायसेल्फ ... सेल फाॅर फाइव्ह डाॅलर्स ईच ..."

पाहिलं तर साधी, गबाळग्रंथी
चित्रं
कसल्याशा छापील साच्यात
स्केच पेननं रंग भरून
किंचित् चुरगाळलेली
सहज वाऱ्याच्या झुळुकीसरशी फडफडणारी

समोर आलं ते घेतलं मी
कॅलिडोस्कोपचं
पाच डाॅलर्स देताच
कृतज्ञता, आभार
बोनस मिळाले

शिवाय जाता जाता
कोरून गेला
मनावरही
कॅलिडोस्कोप
बाहेरून साचेबंद ट्यूब
आत अनेक तुकडे
रंगीबेरंगी फुटक्या काचांचे
त्या तुकड्यांमधून
होणारी विरणारी
क्षणिक चित्रं
आजचा तो ... उद्याचा मी
दोघांच्या हातात
झपाट्याने नगण्य होत जाणारी
पांच डाॅलर्सची नोट


- निलेश पंडित
४ जानेवारी २०१९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा