हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ७ डिसेंबर, २०१८

दिमाख


लोकशाहीचा दिमाखाने पळे बेफाम घोडा
एक मत सगळेच देती उंट हत्ती वा मकोडा

पोटतिडकीने गरीबांच्या भुकेवर बोलतो तो
फक्त आधी रिचवतो भरपूर तो व्हिस्की व सोडा

धोरणे निष्प्रभ जुनी ठरतात आता इंग्रजांची
फोडणे अन् झोडणे होताच वर टाका दरोडा

लीलया हाताळणे मोठ्या समस्या खूप सोपे
आव आणा चिंतनाचा आणि नंतर हात जोडा

खूप वर्षांनी मिळाला वेगळा कोणी महात्मा
वाटले फुलपाखरू पण तो निघाला नाकतोडा

वर्तमानातील नेता व्हायचे आहे तुम्हाला?
रंगवा भवितव्य थोडे रंगवा इतिहास थोडा


- निलेश पंडित
८ डिसेंबर २०१८

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा